तरुणावर हल्ला करून मोबाईल व सोन्याची अंगठी लुटले

Sat 11-Oct-2025,01:01 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: बल्लारपूर कॉलरी मैदानाजवळ फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर तीन अज्ञात युवकांनी हल्ला करून त्याच्याकडील मोबाईल आणि सोन्याची अंगठी लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ९ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे १० वाजता घडली.

तेलंगणा राज्यातील मंचेरियल जिल्ह्याचा रहिवासी विनय चंद्रय्या मुलकाला (वय २४) हा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी ७ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर येथे आला होता. त्याची बहिण व भाऊजी श्रीनिवास गद्देला सुभाष वॉर्ड, कॉलरी क्वार्टर येथे राहतात.

गुरुवारी रात्री जेवणानंतर विनय मोबाईलवर बोलत चालत कॉलरी माईनच्या दिशेने जात असताना तीन अज्ञात युवक अचानक त्याच्याजवळ आले. त्यांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याचा पत्ता विचारू लागले. त्यानंतर त्याच्या हातातील सोन्याची अंगठी काढण्याचा प्रयत्न केला. विनयने विरोध केल्यावर आरोपींनी त्याला मारहाण केली, अंगठी लुटली आणि रेल्वे पटरीच्या दिशेने पळून गेले.

विनयने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी जवळच उभी असलेली दुचाकी घेऊन घटनास्थळावरून फरार झाले. बल्लारपूर पोलिसांनी विनय मुलकाला यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून पोलीसांनी तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.